पंतप्रधान प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात परंतु शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देण्याची गॅरंटी देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे – डॉ. अमोल कोल्हे

पुणे : – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी  गावभेट दौरा केला. या दौऱ्यात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.

दरम्यान, गावभेट दौरा सुरू असताना गंगापूर बुद्रुक ( ता. आंबेगाव) या गावातील एका शेतात कांद्याची काढणी सुरू असताना थेट शेतात जाऊन डॉ. कोल्हे यांनी कांद्याचा बाजारभाव आणि एकूण परिस्थिती बाबत आढावा घेतला. मजूर महिला, कांदा उत्पादक शेतकरी यांनी डॉ. कोल्हे यांच्याशी बोलताना केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली, याशिवाय राज्य सरकारच्या दूध उत्पादक शेतकरी यांच्यात असलेल्या नाराजीचा पाढा शेतकऱ्यांनी वाचला.

यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर टीका केली ते म्हणाले की, “अगोदर ४०% कांदा निर्यात शुल्क लाधला त्यातच जपानवरून घाईघाईने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून कांदा आम्ही खरेदी करणार म्हणून सांगितलं आणि कांद्याचे भाव पाडले, किलोमागे कांदा उत्पादक शेतकर्यांचे ३० रुपये नुकसान होत आहे. शेतकऱ्याच्या आशेवर पाणी फिरवण्याचे काम मोदी सरकारने केलं आहे. पंतप्रधान प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात परंतु शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देण्याची गॅरंटी देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. त्याचबरोबर मध्यप्रदेशच्या निवडणूका झाल्यापासून अजूनही देशाला पूर्णवेळ कृषिमंत्री नसावा हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे”

एकंदरीत आंबेगाव तालुक्यातील शेतकरी केंद्र सरकारवर प्रचंड नाराज असल्याचे या गावभेट दौऱ्यात आढळून आल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. यावेळी कांदा उत्पादक असलेल्या एका महिलेने संवाद साधताना सांगितले की, कांदा लागवडी पासून काढणी पर्यंत ७० ते ८० हजार रुपये खर्च झाला आहे. आता बाजारभाव मात्र पडले आहेत त्यामुळे हातात काहीच शिल्लक राहणार नाही. केवळ माती हातात उरेल अशी परिस्थिती आहे. रासायनिक खतांचे देखील बाजार वाढलेले आहेत. कांदा ठेवावा की बाजारात पाठवावा याची चिंता आहे. गाडी भाडे आणि मजुरांचा रोज देता देखील येत नाही. एवढी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. आमच्या दुधासाठी, कांद्यासाठी आणि सगळ्या शेतमालासाठी संसदेत भांडा अशी विनंती खासदार डॉ.कोल्हे यांच्याकडे या महिलांनी केली.

See also  डॉ. प्रा. कमल कुमारजी जैन यांचा जैन विचार मंच व अरिहंत जागृती मंच च्या वतीने सत्कार

दरम्यान, नारोडी ( ता. आंबेगाव ) येथून सुरू झालेला गावभेट दौरा रात्री उशिरा घोडेगाव परिसरात संपला या दौऱ्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, आंबेगाव बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आंबेगाव तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला तालुकाध्यक्ष पूजा वळसे पाटील,यासह अनेक महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी नेते उपस्थित होते.