निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी-डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. १०: लोकसभा निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करीत असून यापुढेही नियुक्त केलेल्या सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वयक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदार संघात स्वीप अंतर्गत कार्यक्रम घेऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांची शहरी भागातील मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यात यावी. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करावे. आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे.

सी-व्व्हिजील नियंत्रण कक्ष आणि एमसीएमसी समितीने त्यांचा दैनंदिन अहवाल प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावा. फेक न्यूज, वृत्तपत्रातील आक्षेपार्ह बातमी याचीही माहिती देण्यात यावी. आरोग्य विभागाने मतदारसंघनिहाय दिव्यांग मतदारांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी अगोदरच व्हीलचेअरचे नियोजन करावे.

अल्पसंख्याक समाजात पडदा वापरणाऱ्या महिलांची ओळख पटविण्यासाठी व शाई लावण्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यात यावी. ‘तुमचे मतदान केंद्र ओळखा’ हे अभियान राबवून मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती देण्यात यावी. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मॉक पोलच्यावेळी आवश्यकता भासल्यास ईव्हीएममधील बिघाड दुरूस्‍त करण्यासाठी नियंत्रण कक्षात २ तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करावी.

लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असून सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मनुष्यबळ, प्रशिक्षण, वाहन, संगणक, स्वीप, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, ईव्हीएम, पोस्टल बॅलेट, मतदार यादी, मतदार मदत केंद्र, एक खिडकी योजना व  दिव्यांग कक्ष व्यवस्थापन समन्व्यक अधिकाऱ्यांकडून निवडणूक माहिती घेतली.

See also  ‘चला जाणूया नदीला’ अभियानात जिल्हा परिषदेचा सक्रीय सहभाग- मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण