राजेंद्र पंढरपूरे
पुणे : लोकसभा निवडणुकीचे राजकीय चित्र पुणे जिल्ह्यापुरते स्पष्ट झाले आहे. देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी होत आहे. तसेच प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य लढतीत जास्त दिसते.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत होत आहे. फक्त पुणे शहरातील लढत दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये आहे. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा दोन प्रादेशिक पक्षांमध्ये लढत होत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातही याच दोन पक्षांमध्ये लढत आहे. तर, मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये लढत होत आहे.
बारामती आणि शिरूरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या कन्या, विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात प्रमुख लढत आहे. मावळमध्ये मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले, त्यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे बारणे यांना निवडून आणणे ही मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांची जबाबदारी झाली आहे.
ग्रामीण भागात प्रादेशिक पक्षांमध्ये लढती होत आहेत, याचा विचार केला तर असे लक्षात येईल की, विधानसभेसाठीही याच पक्षांचे प्राबल्य राहील. पुणे जिल्ह्यात तरी आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना दुय्यम भूमिका घ्यावी लागेल. २००९ साली भाजप या राष्ट्रीय पक्षाने अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हान दिले होते. यावेळी भाजपने माघार घेऊन उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बाय’ दिला आहे. राष्ट्रीय पक्ष असलेला भाजप बारामतीच्या लढतीतून स्वतःहून बाजूला झाल्याने त्याचे परिणाम आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजपला अनुभवावे लागतील.