‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना करा सुनील माने यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे : केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्वसामान्य लोकांसाठी पाच लाखांचा आरोग्यविमा देऊ केला आहे. मात्र पुणे शहर आणि जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे निवेदन ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना दिले.


त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी आयुष्यमान भारत ही योजना सुरु केली आहे. मात्र या योजने अंतर्गत नेमके कोणत्या आजारांवर उपचार केले जातात याबाबतच्या माहिती अभावी नागरिक आणि रुग्णालयांमध्ये संभ्रम आहे. त्याचप्रमाणे योजनेत अंतर्भूत असणाऱ्या रूग्णालयामध्ये ही हे कार्ड चालत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. अनेक रूग्णालये या योजनेअंतर्गत उपचार नाकारत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांमधूनही या योजने बद्दल निगेटिव्ह बातम्या छापून येत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण रुग्णालय आणि शासन यांच्यामधील दुवा म्हणून काम करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी रुग्णालयांची संख्या ही वाढवणे आवश्यक आहे.

याचे समन्वय करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण या संबंधित घटकांसोबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.

See also  केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी