भाजपचा कार्यकाळ पुण्याच्या पर्यावरणासाठी घातकी – डॉ. विश्वंभर चौधरी

पुणे : शहरातील सर्व आमदार, खासदार, शंभर नगरसेवक निवडून देवून पुणेकरांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. मात्र या काळात भाजपच्या सत्ताधार्‍यांनी पुण्यासाठी काही दिले नाही. त्यांनी नदीचे वाटोळे केले, शहरातील टेकड्या उद्धवस्त करण्याचा घाट घातला. भाजप कार्यकाळ आणि मुरलीधर मोहोळ यांच्या महापौरपदाचा कार्यकाळ शहराच्या पर्यावरणासाठी घातकी ठरला आहे, अशी टिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केली.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चौधरी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, वीरेंद्र किराड, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी इत्यादी उपस्थित होते.

चौधरी म्हणाले, भाजपने शहराची सत्ता उपभोगताना पर्यावरणवाद्यांना विश्वासात न घेता, पर्यावरणाला मारक ठरणारे प्रकल्प आणले. त्यांचा कारभार हुकूमशाही पद्धतीने केला. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. पाण्याचा प्रश्न ही गंभीर होत आहे, त्यांनी यावर काहीच केले नाही. या गोष्टी आम्ही ‘निर्भय बनो’ सभेच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडणार आहोत. आम्ही उमेदवारांचा थेट प्रचार करत नाही. मात्र देशातील परिस्थिती पाहून आम्ही महाविकास आघाडीला पाठींबा देत आहोत. आम्ही मत मागत नाही पण लोकांची मते बदलतो. विदर्भात काँग्रेसची लाट आहे. तर मराठ्यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांची लाट आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील,  असेही चौधरी म्हणाले.

गेल्या दहा वर्षातील मोदी यांच्या कारकिर्दीचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसल्याचे विदर्भ, मराठवाडा येथे घेतलेल्या निर्भय बनोच्या सभामध्ये निदर्शनास आले. नरेंद्र मोदींनी सत्तेच्या माध्यमातून संविधानाला नख लावण्याचे आणि लोकशाही संपवण्याचे काम सुरू केले आहे. भाजपने लोकसभेच्या पहिल्या दोन निवडणुकांमध्येही विकासाचा मुद्दा आणला नाही. ही निवडणुक निवडणुक रोखे व विकासावर आधारीत आहे, त्यामुळे मोदींनी दोऩ दिवसांपासून हिंदु मुस्लिमांवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्यायव इतर गोष्टी आहेत. मात्र, भाजपकडून काँग्रेसच्या जाहीरनाम्यासंदर्भात धादांत खोटा प्रचार केला जात आहे. रामाचा मुद्दा संपलेला आहे. त्यामुळे ते धर्माकडे निवडणुक नेते आहेत. राज्यात मागील दोन महिन्यात 457 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. मात्र, यावर भाजपचे कोणीच बोलत नाहीत.
प्रारंभी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

See also  इंडिया आघाडी होत असल्याने सीबीआयच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी भाजपचे महा-षडयंत्र : आम आदमी पार्टी