पुणे : लोकसंख्या नियंत्रणाबाबत मुस्लिम समाजात सुधारणा होत असताना, त्याकडे दुर्लक्ष करून निवडणूक प्रचारात या विषयाचे राजकीय भांडवल पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यांची विधाने दुर्दैवी आणि खेदजनक आहेत, असे मत मांडणारे निवेदन मुस्लिम सत्यशोधक मंडळाने प्रसिद्धीस दिले आहे.
मुस्लिम जमातवाद संपला असे आमचे म्हणणे नाही, असे मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणातून आलेले आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी राजकीय भांडवल करण्यातच पंतप्रधान मोदी सरकारची शक्ती खर्ची घालत आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.
लोकसंख्या नियंत्रणाबाबत मुस्लिमांमध्ये प्रगती होत आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, हा विषय घेऊन मुस्लिम द्वेष वाढवायचा अशी आघाडीच हिंदुत्ववादी संघटनांनी उघडली आहे. याबाबत पंतप्रधान मोदीही अपवाद ठरले नाहीत, हे खेदजनक आहे.
‘सबका साथ, सबका विकास’ असा नारा देणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी मुस्लिम द्वेष आणि विखारी वक्तव्याबद्दल मौन बाळगले होते, मात्र राजस्थानमध्ये प्रचार सभेत मुस्लिम समाजाबद्दल कथित वक्तव्य केले. संपत्ती वाटपाबाबतही भारतीयांची दिशाभूल करणारे, सामाजिक सौहार्दतेच्या वातावरणाला तडा देणारे वक्तव्य मोदींनी केले. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे धर्मनिरपेक्ष आणि एकात्म भारतीय समाज निर्माण करण्यात पेच वाढेल, असे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे मत आहे.
सत्ता संपादन करण्यासाठी एखाद्या समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे, समाजात शत्रूभाव निर्माण करणे देशाच्या एकात्मतेला धक्का देणारे ठरते, याचे भान राजकीय पक्ष ठेवत नाहीत, ही चिंतेची बाब आहे, अशी खंत मुस्लिम सत्यशोधक मंडळाने व्यक्त केली आहे.
मुस्लिम समाज देशावरील भार आहे, या समाजाचे प्रश्न न संपणारे आहेत आणि मानसिकता बायोलॉजिकल फॅक्टर आहे, अशी पूर्वग्रहदूषित धारणा ठेऊन मुस्लिम समाजाला दूषणे देणे ही हिंदुत्ववादी संघटनांची जुनी कार्यशैली आहे. लोकसभा निवडणूकपूर्व काळापासूनच हिंदू तुष्टीकरण आणि हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचे तंत्र भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून वापरण्यात येत आहे. मुस्लिम समाजाबद्दल आकस आणि शंका वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक अपप्रचाराचे हत्यार वापरल्याचे अनेक दाखले देता येतील, असे मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या निवेदनात म्हटले आहे.