जत्रा,यात्रा आणि वाटप संस्कृतीचा चुकीचा पायंडा मतदारसंघात पडला विजय डाकले यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला आता महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातूनही
पाटील यांच्या उमेदवारीला विरोध सुरू झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी आणि राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे माजी अध्यक्ष विजय डाकले यांनी कोथरुडमधून उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने उमेदवारी न
दिल्यास कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


कोथरूड विधानसभा मतदारसंघात केवळ एकाच भागाचा विकास झाला आहे. जत्रा,यात्रा आणि वाटप संस्कृतीचा चुकीचा पायंडा या मतदारसंघात पडला असल्याचा आरोप डाकले यांनी पत्रकार परिषदेत केला. कोथरूडचा विकास करण्यासाठी पक्षाने
उमेदवारी द्यावी, अशी मागणी डाकले यांनी केली आहे. दरम्यान, कोथरुड मतदारसंघातून भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर आणि अमोल बालवडकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे डाकले यांनी उमेदवारीची मागणी केल्याने पाटील यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

स्थानिकतेच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांना सातत्याने विरोध होत असताना स्वतःच्या पक्षातील तसेच मित्र पक्षातील उमेदवारांनी कोथरूडच्या जागेवर प्रबळ दावेदवारी सांगितल्याने चंद्रकांत पाटील यांच्या संघर्षात वाढ झाली आहे. याला चंद्रकांत पाटील कसे सामोरे जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

See also  पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ