मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना

पुणे, दि. १०: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत पुणे येथून ७२९ जेष्ठ नागरिक व ७१ सहायक अशा ८०० यात्रेकरुंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली भारत गौरव पर्यटन रेल्वे श्रीराम जन्मभूमी अयोध्येकडे रवाना झाली. राज्यात ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने शासकीय दुखवटा जाहिर झाल्याने साधेपणाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अयोध्येकडे रवाना होणाऱ्या तीर्थयात्रेकरुंना चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

यावेळी आय.आर.सी.टी.सीचे जनरल मॅनेजर गौरव झा, क्षेत्रीय अधिकारी गुरुराज सोना तसेच समाजकल्याण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

या तीर्थयात्रेच्या निमित्ताने एका महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या चित्रफित शुभेच्छा संदेशात म्हणाले. ही योजना राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधून सुरु झाली आहे. तीर्थदर्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अभिनंदन केले. 

यावेळी ‘जय श्रीराम, जय श्रीराम’ या जयघोषात पुणे रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन ८०० यात्रेकरु तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे मार्गस्थ झाले.

See also  पावसाळ्यात नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यात यावी - खासदार मेधा कुलकर्णी