पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) यंत्रांची कमिशनिंग प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी सचिन आखाडे, सहाय्यक अधिकारी नारायण पवार, गजानन किरवले, लक्ष्मीकांत गव्हाणे, विवेक गावंडे,महादेव दुधाळ,वंदना छाडीकर, मीना शिंदे,शेखर मते, रवी बडेकर आणि गजेंद्र खैरमोडे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली जात आहे.
या प्रक्रियेत इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची जोडणी करण्यात येते, तसेच उमेदवारांचे चिन्ह (सिम्बॉल) यंत्रांमध्ये अपलोड केले जाते. प्रत्येक यंत्राची कार्यक्षमता तपासण्यासाठी mock poll (प्रात्यक्षिक मतदान) घेतले जाते, ज्याद्वारे यंत्रांमध्ये कोणताही तांत्रिक दोष नसल्याची खात्री केली जाते. या तपासणी आणि प्रात्यक्षिक प्रक्रियेनंतर यंत्रे शीलबंद करून प्रत्यक्ष मतदानासाठी तयार करण्यात येतात.
या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही सहभागी आहेत, ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक राहते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, प्रत्येक यंत्राची तपासणी अत्यंत काटेकोरपणे केली जाते.
मतदान प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नये आणि मतदारांचा विश्वास दृढ राहावा, यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांना सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदानाचा अनुभव मिळेल, असे निवडणूक अधिकारी डॉ. माने यांनी सांगितले.