पुणे : चीनने 1950 साली तिबेटवर आक्रमण केले त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी चीन कडून धोका असल्याचे म्हंटले होते. मात्र पुढे पं. जवाहरलाल नेहरूंनी हिंदी – चीनी भाई भाई ची घोषणा दिली, पुढे 1962 साली आपल्याला किंमत चुकवावी लागली. अलीकडे गलवान मध्ये तसे करण्याचा प्रयत्न केले मात्र आजच्या भारताने आरे ला कारे उत्तर दिले. आजच्या परिस्थितीत चीनमध्ये लोकशाही अस्तित्वात आली तर भारताला आणि जगाला देखील फायदा होईल असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
चेतक बुक्सने प्रकाशित केलेल्या आणि पराग देव यांनी लिहिलेल्या ‘ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्माधिकारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी लेखक पराग देव, अनय जोगळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना धर्माधिकारी म्हणाले, नेहरू यांच्या चुकीच्या धोरणामुळे चीन आपल्याला डोईजड झाला होता. आजही त्यांचे परिणाम आपल्याला दिसत असून आपल्या देशाला धोका असलेल्या देशांच्या यादीत आजही चीन नंबर एक वर आहे. यामुळे आपल्याला चीनचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. मोरे म्हणाले, बौद्ध धम्म चीन मध्ये गेला त्यावेळी अनेक चीनी अभ्यासक, विचारवंत भारतात आले, त्यांनी आपल्या देशाचा अभ्यास केला, इथले आणेक ग्रंथ चीनी, तिबेटी मध्ये अनुवादित केले. आपल्याकडे परकीय आक्रमणा नंतर अनेक ग्रंथ नष्ट झाले मात्र ते तिकडे उपलब्ध आहेत, त्यांचे आपल्याकडे पुन्हा येणे गरजेचे आहे. जागतिक राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरी योग्य वेळी प्रकाशित झाली असून ती इंग्रजी मध्ये भाषांतरीत व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
जोगळेकर म्हणाले की भारताच्या शेजारी असलेला आणि जागतिक राजकारणात महत्वाचा देश असलेल्या चीन बद्दल आपल्याला फार काही माहिती नसते पण अशा स्वरूपाच्या कादंबरीमुळे आपल्याला शेजारच्या देशाबद्दल नक्कीच माहिती मिळू शकते. लेखक पराग देव यांनी मनोगत व्यक्त करताना पुस्तकामागील प्रेरणा आणि भूमिका मांडली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.