भारती विद्यापीठात स्वसंरक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून महिलाशक्तीचे बळकटीकरण

पुणे: महिलांना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन सक्षम आणि आत्मविश्वासू बनवण्याच्या उद्देशाने भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्कूल ऑफ मार्शल आर्ट्स, पुणे यांच्या सहकार्याने ‘निर्भया कन्या अभियान’ अंतर्गत एक दिवसीय स्वसंरक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे आणि विषयतज्ज्ञ म्हणून स्कूल ऑफ मार्शल आर्ट्स, पुणे संस्थेचे संस्थापक श्री. विकास बधाडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम होण्यास मदत केली.

कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “महिलांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत जागरूक राहिले पाहिजे. आत्मसंरक्षणाचे ज्ञान संकटासमोर धैर्याने उभे राहण्याची क्षमता विकसित करते आणि आत्मविश्वास वाढवते.”

प्रशिक्षण सत्रात विद्यार्थिनींना विविध स्वसंरक्षण तंत्रे शिकवण्यात आली. यामध्ये जागरूकता, शरीरभाषा आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व समजावून देण्यात आले. श्री. बधाडे व त्यांच्या टीमने विद्यार्थिनींना बचावात्मक स्थिती, हल्लेखोरापासून बचाव करण्याचे तंत्र, तसेच हल्लेखोराच्या पकडीपासून मुक्त होण्याचे उपाय शिकवले.

विशेषतः गुडघा, कोपर आणि मुठीचा प्रभावी वापर करून हल्लेखोराला निष्प्रभ करण्याचे कौशल्य विद्यार्थिनींनी आत्मसात केले. नाक, डोळे, गुडघे आणि इतर कमजोर ठिकाणी प्रहार करण्याचे तंत्र, तसेच सुरी, काठी यांसारख्या शस्त्रांपासून बचाव करण्याच्या युक्त्या शिकवण्यात आल्या. प्रत्यक्ष सरावामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि सजगता वाढीस लागली.

विद्यार्थी विकास अधिकारी व या कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. कल्याणी चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, तर प्रा. डॉ. निलोफर मुल्ला व प्रा. उर्मिला झोपे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच प्रा. डॉ. सीमी खान यांनी कार्यशाळेच्या नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रा. पल्लवी नारखेडे यांनी आभारप्रदर्शन केले.

महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरत असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी सकारात्मक भावना या कार्यशाळेमधून व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मरक्षणाची क्षमता वाढली असून त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत अधिक सजग राहण्याची प्रेरणा मिळाली आहे.

See also  मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब ४४ हजार ७८४ मते मिळवून विजयी – विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू