पुणे : खडकवासला पंचक्रोशीतील सिंहगड रोडवरील जेपी नगर, नांदेड येथील श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत पतसंस्थेचे संस्थापक संचालक बाळासाहेब हगवणे यांच्या नेतृत्वाखाली श्री रामेश्वर पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला. विरोधी निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना अल्प मते मिळाली.
रामेश्वरच्या 13 संचालकांपैकी चार संचालक बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे नऊ जागांसाठी रविवारी निवडणूक झाली.
या जागांवर रामेश्वर पॅनलचे उमेदवार 90 पेक्षा अधिक मते मिळवून विजयी झाले आहेत. श्री रामेश्वर पॅनलचे सर्वसाधारण जागेवर सचिन दशरथ दांगट, विकास पंढरीनाथ दांगट, अभिजीत सोपान घुले, बाळासाहेब काळूराम घुले, बाळासाहेब अर्जुनराव हगवणे, राजेंद्र गणपत हगवणे, देविदास एकनाथ लगड, विलास साधू मते, तर विशेष मागास राखीव प्रवर्गात राजेश शंकर देवकर हे उमेदवार यशस्वी झाले आहेत. तसेच विनादेवी विजय मते, मनीषा भगवान मोरे, विकास रामदास कोल्हे, नागेश सोपान शिंदे हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
निवडणुकीनंतर श्री रामेश्वर पॅनलचे प्रमुख बाळासाहेब हगवणे यांनी सभासद मतदारांचे आभार मानून सांगितले की, सभासदांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. रामेश्वर पॅनलला सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिल्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली आहे. आगामी काळात संस्थेचे 200 कोटीचे उलाढाल करण्याचे उद्दिष्ट असून युवकांना उद्योग व्यवसायासाठी किरकोळ, मध्यम आणि छोट्या व्यापाऱ्यांना पतपुरवठा करण्यात येणार आहे.