पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांना परिषदेच्या घटनेचे उल्लंघन व आज्ञाभंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलंबित केले. यामुळे कुस्ती क्षेत्रामध्ये परिषदेच्या स्थापनेपासून कारवाई ची मोठी घटना पहिल्यांदाच घडली असून बाळासाहेब लांडगे यांना बेकायदेशीर कृतीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 2025 ते 2029 कार्यकारी समितीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. याबाबत परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुका मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज येथे 26 व 27 जुलै रोजी होतील असे जाहीर केले होते. माननीय उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या पर्यवेक्षण व देखरेखीखाली सदर निवडणुका पार पाडल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
परंतु महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी 16 जुलै रोजी समांतर बेकायदेशीर निवडणुका कार्यक्रम पत्रकार द्वारे जाहीर केला. अधिकारात नसताना सचिव बाळासाहेब लांडगे यांनी पदाचा वापर केल्याप्रकरणी अध्यक्ष शरद पवार यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असून या प्रकरणाचा निकाल लागत तोपर्यंत लांडगे यांना निलंबित केले असल्याचे शरद पवार यांनी निर्देश दिले आहेत. यामुळे कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.