वाघोली येथील सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी महिलांकडून आकारले जातात दहा रुपये: राष्ट्रवादीची कारवाईची मागणी

पुणे : वाघोली येथील पी एम पी एल बसस्थानकावरील सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी जाणाऱ्या लाडक्या बहिणींची केली जाणारी अन्यायकारक व अवैध आर्थिक लूट थांबवावी व अधिकृत दरफलक लावण्यात यावी अशी मागणी पुणे मनपा आयुक्त यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

वाघोली येथील पीएमटी बसस्थानकावर पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक शौचालयात महिलांकडून लघुशंकेसाठी १० रुपये आकारले जात आहेत. ही रक्कम कोणतीही अधिकृत पावती न देता, जबरदस्तीने वसूल केली जाते.

ही वसुली संपूर्णपणे अवैध असून महिलांच्या सन्मानाशी प्रतारणा करणारी आहे. एकीकडे सरकार ‘लाडकी बहिण योजना’ आणि ‘महिला सबलीकरण’ यासारख्या योजना जाहीर करून महिलांना प्राधान्य देत आहे, तर दुसरीकडे पुणे महापालिकेच्या अधिपत्यातील ठेकेदार महिलांकडून शौचालयासाठी जबरदस्तीने पैसे उकळत आहेत, हे अत्यंत लज्जास्पद आणि विरोधाभासी आहे.

सदर ठिकाणी  प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, पुरुषांकडूनही काहीवेळा पैसे मागितले जात असल्याचे निदर्शनास आले. जेव्हा संबंधित ठेकेदाराकडे अधिकृत दरफलक अथवा आदेश मागितला, तेव्हा त्यांनी माहिती देण्यास नकार दिला व विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

संबंधित ठेकेदारावर कारवाई करून महिलांकडून लघुशंकेसाठी घेतले जाणारे शुल्क त्वरित थांबवावे. सार्वजनिक शौचालयावर अधिकृत दरफलक लावण्यात यावा. शौचालय सेवेसाठी होणाऱ्या कोणत्याही शुल्कवसुलीला पारदर्शकता यावी, व पावतीव्यवस्था सक्तीची करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

अर्जाचा गांभीर्याने विचार करून लवकरात – लवकर योग्य ती कार्यवाही करावी  अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सरचिटणीस प्रकाश जमधडे यांनी दिला आहे.

See also  अनाधिकृत ओवरहेड केबल पुढे पुणे मनपा आयुक्तांसह अधिकारी हातबल का? चिरीमिरीच्या धोरणामुळे बुडतोय कोट्यावधींचा महसूल