पुणे विद्यापीठ चौकातील पुलाच्या उद्घाटनाचे किती टप्पे असणार? बाणेर मार्ग, पाषाण मार्ग, मेट्रो असे उद्घाटनाचे टप्पे असणार की …

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील अर्धवट पुलाच्या एका बाजूचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचा हस्ते पार पाडण्यात आले. पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी विचारात घेता उद्घाटनासाठी रस्त्याची लेन थांबवणे ही बाब अनेक पुणेकरांना फारशी पटली नाही. परंतु पहिल्या टप्प्याचे उद्घाटन असे सांगत हा उद्घाटन समारंभ अवघ्या चार मिनिटात पार पडला. यासाठी पुणेकरांना वेठीस धरण्यात आले. उद्घाटन झाले खरे पण पुलाचे नक्की किती टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे याबाबत मात्र अद्याप कोणताही खुलासा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला नाही.

राजभवन औंध कडून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या एका मार्गीकेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना अनेक आठवडे वेठीस धरले होते. हा पहिला टप्पा पार पडला असला तरी पुलाचे उद्घाटन बाणेर बाजूची मार्गीका तसेच पाषाण बाजूची मार्गिका असे तीन टप्प्यात होणार आहे का? याशिवाय मेट्रोचे उद्घाटन हा वेगळा टप्पा असणार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. यातच भर म्हणजे पुणे विद्यापीठ चौकातील खालील रस्त्यांच्या सुशोभीकरणाचा देखील उद्घाटनाचा टप्पा पार पडेल की काय असा उपहासात्मक प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांना उद्घाटनाचे सोहळे करून दाखवण्यापेक्षा वाहतूक कोंडीवर उपाययोजना ठरणारे रस्ते त्वरित सुरू केले गेले पाहिजे. सिंहगड रस्त्यावरील ब्रिज बांधून तयार असताना अद्याप त्याचे उद्घाटन झालेले नाही यासाठी सातत्याने आंदोलने देखील होत आहे परंतु याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय ठरणारे मार्ग उद्घाटनासाठी अडवून धरण्यात येऊ नये अशी मागणी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या माध्यमातून केली जात आहे.

See also  मुक्तछंदच्या महिला उद्योजकांच्या वस्तूंच्या “धागा” प्रदर्शनाचे उदघाटन