संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून आकाराला येतेय नारळांचे गाव

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील भोजदरी या गावांमध्ये ‘ एक पेड मा के नाम ‘ या उपक्रमांतर्गत विविध महाविद्यालयातून आलेल्या शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून श्रमदानाच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड नुकतीच करण्यात आली.

” चला झाडे लावूया, आपल्या गावाला सुंदर बनवूया” या गावातील तरुणांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत आळे तालुका जुन्नर येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालय, ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, घारगाव तालुका संगमनेर येथील सिताई महाविद्यालय तसेच पुणे येथील सेंट व्हिन्सेंट महाविद्यालयाबरोबरच, भोजदरी गावातील भोजादेवी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील या श्रमदानामध्ये आणि वृक्षारोपणामध्ये आपला सहभाग नोंदवला.300 हून अधिक विद्यार्थी, 35 हून अधिक प्राध्यापक, चारही महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच भोजदरी गावातील मुंबई, पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि संगमनेर स्थित चाकरमाने मंडळींच्या सहभागाने या वृक्षारोपण श्रमदानाच्या कार्यक्रमाला एका आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

गोपाळकाल्याच्या दिवशी आयोजित केलेल्या या वृक्षारोपणाची सुरुवात दहीहंडीच्या कार्यक्रमाने झाली. आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील तरुणींनी एकत्र येत गावची दहीहंडी फोडून सर्वांचीच मने जिंकली. विशेष म्हणजे विविध महाविद्यालयातून आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयकांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी साधारणता दहा ते पंधरा फूट उंचीची शेकडो नारळाच्या झाडांचे वृक्षारोपण करून गावाला ‘नारळाचे गाव’ बनवण्याच्या गावकऱ्यांच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी वृक्षारोपणानंतर आयोजित केलेल्या औपचारिक सभेला तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते, त्याचबरोबर संगमनेर तालुक्याचे आमदार श्री अमोल खताळ यांच्या पत्नी श्रीमती निलमताई अमोल खताळ या देखील उपस्थित होत्या. “तरुणांनी श्रमाचे महत्त्व जपले पाहिजे, मुलांनी व्यायाम केला पाहिजे, आपल्या आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केली पाहिजेत असा आशावाद व्यक्त करतानाच वृक्षारोपणासारख्या सामाजिक जाणवेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. श्रीमती निलमताई अमोल खताळ यांनी गावाला ‘नारळाचे गाव’ बनवण्याच्या या संकल्पाचे भरभरून कौतुक केले. या निमित्ताने वृक्षारोपणाच्या माध्यमातून या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची कौतुक करताना गावातील तरुणांनी मनावर घेतले तर पठार भागामध्ये सुद्धा कोकणसारखे निसर्ग सौंदर्य तयार होऊ शकते अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सात डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या गावाला पर्यटनासाठी जाण्यासाठी मी तालुक्यातील इतर गावांना आवाहन करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

See also  पुणे महानगरपालिकेवर आंदोलनानंतर औंध परिहार चौक येथील 30 अनधिकृत स्टॉलवर कारवाई


हा उपक्रम पार पाडण्यासाठी गावातील पुणे स्थित प्रा.भाऊसाहेब घोडके प्रा.योगेश मते, वृक्षप्रेमी एकनाथ डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर मते, भास्कर भारती, पोपट वाळुंज, गणेश मते, योगेश सुखदेव मते, अविनाश भागवत, पवन उगले, सतीश उगले, जगदीश हांडे, जिजाभाऊ भुतांबरे, भाऊराव हांडे, प्रकाश डोंगरे, मारुती डोंगरे, सुदर्शन डोंगरे, विकास हांडे, दिलीप पिंपळे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव मते आदींचे विशेष सहकार्य लाभले.

संगमनेर सहकारी साखर कारखाना पाणलोट विकास कार्यक्रमाचे डेव्हलपमेंट मॅनेजर शंकर डमक, हरिश्चंद्र फेडरेशनचे मॅनेजर बाळासाहेब फापाळे आणि बाळासाहेब उंबरकर यांच्या विशेष सहकार्याने तसेच सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कारखान्याचे चेअरमन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आणि युवा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, मालपाणी उद्योग समूहाचे गिरीषजी मालपाणी आदींचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले.
या कार्यक्रमांमध्ये अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूरचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे, राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी राजेंद्र आंबवणे , बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे येथील प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी जयसिंग गाडेकर, सिताई कॉलेज घारगावचे प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर इंगळे, प्रा. मंगेश वाघमारे, भोजादेवी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. संजय बोंतले, श्री विलास देशमुख, तसेच सामाजिक कार्यकर्ते मा.जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, सामाजिक कार्यकर्ते सुहास वाळुंज, गौरव डोंगरे यांनी उपस्थिती दर्शवून मोलाचे सहकार्य केले.

गावातील मुंबई, पुणे, नगर, नाशिक, संगमनेर आणि भोजदरीकर यांच्या आर्थिक देणगीतून संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.भाऊसाहेब घोडके यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत प्रा. योगेश मते यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक भोजदेवी माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री विलास देशमुख यांनी केले.
भोजदरीच्या तरुणांनी राबवलेल्या नारळांच्या झाडांच्या वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमाचे आजूबाजूच्या परिसरातून कौतुक होताना दिसत आहे आणि या उपक्रमातून प्रेरणा घेऊन शेजारील गावचे तरुण देखील असाच उपक्रम आपल्या गावामध्ये राबवण्याचे प्रयोजन करत आहेत असे दिसून येत आहे.एकूणच भोजदरीच्या तरुणांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून पठारभागामधलं नारळांचं गाव लवकरच आकाराला येत आहे असे दिसते.