आम्हाला सर्व सुविधांसह एकात्मिक विकास हवा! लोकमान्यनगर पुनर्विकासाबाबत रहिवासी संघाची भूमिका

पुणे : शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. स्थानिक रहिवाशांच्या ‘लोकमान्यनगर रहिवासी संघाने’ सर्व सुविधांसह एकात्मिक क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांनी नुकतेच एक पुनर्विकास धोरण जाहीर केले आहे, ज्यामुळे पुण्यातील प्रमुख आणि मध्यवर्ती वसाहतींपैकी एक असलेल्या लोकमान्य नगरचा कायापालट होणार आहे. त्यामुळे तुकड्यांमध्ये विकास न होता एकत्रित पुनर्विकास व्हावा, अशी मागणी लोकमान्यनगर रहिवासी संघाने पत्रकार परिषद घेत केली आहे.

यावेळी रहिवासी संघाचे अध्यक्ष विनय देशमुख, सुनील शहा, प्रशांत मोहोळकर, विवेक लोकूर यांच्यासह मोठ्या संख्येने रहिवाशी उपस्थित होते. एकत्रित पुनर्विकास झाल्यास सर्व सोयीसुविधांसह शहराच्या मध्यभागी वसलेल्या 16 एकरांचा हा प्रकल्प महाराष्ट्रातील पुनर्विकासाचा आदर्श ठरणार आहे. लोकमान्य नगरच्या रहिवाश्यांनी गेली अनेक वर्षे ज्या गोष्टीसाठी ध्यास घेतला होता, त्यांच्या स्वप्नाची पूर्तता म्हाडाचे नवीन धोरण समर्थपणे करु शकेल. भविष्यातील पिढ्‌यांच्या गरजा लक्षात घेऊन हे सर्व नियोजन करणे गरजेचे आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील 100 वर्षे रहिवाशाना पायाभूत सुविधा किंवा जीवनशैलीतील सुधारणांची चिता करावी लागणार नाही, अशी भूमिका यावेळी नागरिकांच्या वतीने मांडण्यात आली.

दरम्यान, एकल पुनर्विकास केल्यास मर्यादित सोयीसुविधा, छोट्या जागेमुळे कमी आकाराचे फ्लॅट्स, असमान व विस्कळीत बांधकाम, तसेच इन्फ्रास्ट्रक्चरवर अतिरिक्त ताण अशा अनेक समस्या निर्माण होणार आहेत. यामुळे एकात्मिक पुनर्विकास केल्यास संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. तसेच उद्यान, पार्किंग, सामुदायिक हॉल, सुरक्षा व्यवस्था यांसारख्या आधुनिक सोयी मिळतील. शिवाय रुंद रस्ते, पाणीपुरवठा, वीज व ड्रेनेजसारख्या सुविधा योग्य पद्धतीने उभारणे शक्य होणार असल्याचं सुनील शहा यावेळी म्हणाले.

See also  खडकवासला विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची तीन टप्प्यांत खर्च तपासणी