ईशान्य भारत आणि महाराष्ट्राचे संबंध नवीन पिढीला प्रेरणा देणारे –उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : ईशान्य भारत आणि महाराष्ट्राचे संबंध नवीन पिढीला प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. त्या “पोमै नागा त्सीदौमै मे पुणे” या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

या प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी ईशान्य भारत आणि महाराष्ट्रातील दृढ व मैत्रीपूर्ण नातेसंबंध अधोरेखित केले. संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीला “विश्वास, एकता आणि दृष्टी यांचा वारसा” असे गौरवून समाजाच्या योगदानाचे अभिनंदन केले. पुणे हे “पूर्वेचे ऑक्सफर्ड” म्हणून ईशान्य भारत आणि महाराष्ट्राला जोडणारा पूल ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे आयटी, जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय, कायदा व सर्जनशील क्षेत्रांचे उगवते केंद्र ठरत असून प्रांत, भाषा वा धर्म न पाहता प्रतिभेला संधी मिळते, असे त्या म्हणाल्या. नागा समाजाच्या खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक पोशाखांचे त्यांनी विशेष कौतुक केले. महाराष्ट्र शासन या सांस्कृतिक बंधांना अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ईशान्य भारतातील वृद्ध पालक दूर असल्याने समाजातील सदस्यांना भेडसावणाऱ्या भावनिक आव्हानांची जाणीव व्यक्त करत, त्या भागात वृद्धांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुण्यात किंवा महाराष्ट्रात वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी वैयक्तिक मदत करण्याचे आश्वासनही दिले.

भाषणाच्या शेवटी युवकांना “मोठी स्वप्ने पाहा, संधी साधा आणि एकता, सेवा व उत्कृष्टतेची मूल्ये पुढे न्या” असे प्रेरणादायी आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाला जनरल सेक्रेटरी डॉ. एच. गिडीयन, पायोनियर श्री. एम. हेनी, संस्थापक डॉ. आर. बी. थोहे पू, श्री. पी. एम. जॉय चार्ल्स, श्री. दैखो रॉबिन, संयोजक श्री. सॅम्युएल हेशो बेमाई यांच्यासह समाजातील मान्यवर, आध्यात्मिक व व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  कोंढाणा विजयाच्या स्मृती अमृतेश्वराचे यात्रेतुन पुन्हा: जागवल्या.