पुणे : नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन वाहनांना आग लागून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक झालेल्या या दुर्घटनेने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तातडीने घटनास्थळी रवाना होऊन बचावकार्य सुरू केले.
सायंकाळी साधारण पाच वाजून चाळीस मिनिटांनी नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर आग इतक्या वेगाने पसरली की दोन कंटेनर आणि मधोमध अडकलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली; मात्र त्यापूर्वीच वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता. कंटेनरमधून दोन पुरुषांचे तर कारमधून दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचे असे सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या कंटेनरने मागील वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर हा अपघात घडला. धडक इतकी जबरदस्त होती की काही क्षणांतच वाहनांना आग लागली आणि आसपास भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह चार अधिकारी आणि चाळीस जवान पूर्ण क्षमतेने कार्यरत होते.
पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही तातडीने सक्रिय झाली. अग्निशमन विभागाच्या तीन फायर इंजिन, एक ब्राउझर, दोन रेस्क्यू व्हॅन तसेच पीएमआरडीएच्या तीन फायर गाड्या आणि दोन रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या. त्याचबरोबर जेसीबी, क्रेन आणि अॅम्बुलन्सची व्यवस्था करून बचावकार्य गतीने सुरू करण्यात आले. लायगुडे रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टर आणि पथके घटनास्थळी सतत मदतकार्य करत होती. 108 नंबरच्या तीन अँबुलन्सेस आणि मनपाच्या पाच अँबुलन्सेसचा वापर करून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, क्षेत्रीय उपायुक्त, अभियंते आणि मनपाचे शेकडो कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून रेस्क्यू आणि मदतकार्याचे समन्वयन करत होते. तसेच जळालेली वाहने क्रेनच्या मदतीने हटवून रस्ता स्वच्छ करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्यावर पडलेल्या तेलामुळे निसरडे झालेले क्षेत्र फायर फायटर मशीनच्या साहाय्याने स्वच्छ केले जात आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली असून, त्यांच्या सूचनेनुसार सर्व विभागांकडून समन्वय साधून मदतकार्य केले जात आहे. या भीषण अपघाताने पुन्हा एकदा नवले पुलावरील वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, पुढील सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.























