पुणे: दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे भारतीय संविधान दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थीनी आणि सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्तावनेच्या सामूहिक वाचनाने झाली, ज्यातून एकात्मता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण झाली.
प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी संविधान हा केवळ कायदा नसून भारताच्या लोकशाही विचारांचा जिवंत दस्तऐवज आहे, असे सांगत विद्यार्थिनींना जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले.
विद्यार्थिनींनी चर्चासत्रातून संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांवर विचार मांडले. तांत्रिक शिक्षणासोबत लोकशाही मूल्यांची जपणूक हीच खरी शिक्षणदृष्टी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला. महाविद्यालयाने पुन्हा एकदा दाखवून दिले की ज्ञानाबरोबर नैतिक दृष्टीकोन विकसित करणे हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे.
उपप्राचार्य प्रा. डॉ. अविनाश पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. सविता इटकरकर यांनी प्रभावीपणे केले.






















