पुणे :पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या बाणेर परिसरात कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांनी दोन दिवसीय गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधला. घराघरांत जाऊन त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच परिसरातील नागरी सुविधा आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
या दौऱ्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, व्यापारी वर्ग आणि स्थानिक रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्यातील अडचणी, स्वच्छतेचा अभाव, ड्रेनेज व्यवस्था, अपूर्ण पायाभूत सुविधा आणि स्थानिक रोजगाराच्या संधी याबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी व सूचना मांडल्या. उपस्थित प्रत्येक प्रश्न गांभीर्याने नोंदवून त्यावर लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन बालवडकर यांनी दिले.
यावेळी बोलताना लहू बालवडकर म्हणाले, “प्रभाग क्रमांक ९ चा संतुलित, नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकास हेच माझे ध्येय आहे. नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारात जाऊन समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधणे हीच माझी कार्यपद्धती आहे. संवादातून विश्वास आणि विश्वासातून जबाबदारी निर्माण होते.”
केंद्रीय मंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ तसेच आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर परिसरात आवश्यक विकासकामांना गती दिली जाईल, असा विश्वासही बालवडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
हा गावभेट दौरा पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असून, प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचा निर्धार लहू बालवडकर यांनी व्यक्त केला. या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























