पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असताना, लहू बालवडकर यांनी सातत्यपूर्ण जनसंपर्कावर भर देत आपली उपस्थिती ठळक केली आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे या परिसरात घराघरांत जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा त्यांचा उपक्रम सध्या चर्चेत आहे.
या जनसंपर्कादरम्यान नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, पायाभूत सुविधांचे प्रश्न, नागरी सेवा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. केवळ तक्रारी ऐकून घेण्यापुरते न थांबता, संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना लहू बालवडकर यांनी ‘सेवा हे केवळ कर्तव्य नसून धर्मकर्म आहे’ ही भूमिका सातत्याने अधोरेखित केली आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी थेट संपर्क हाच प्रभावी मार्ग असल्याचे ते मानतात. त्यामुळेच औपचारिक कार्यक्रमांपेक्षा प्रत्यक्ष वस्ती, गल्ल्या आणि घरांपर्यंत पोहोचण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून येते.
प्रभागातील अनेक भागांत लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात फिरकत नसल्याची भावना असताना, घराघरांत जाऊन संवाद साधण्याची ही पद्धत नागरिकांच्या दृष्टीने सकारात्मक ठरत असल्याची चर्चा आहे. विशेषतः तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि नव्या मतदारांमध्ये या जनसंपर्क मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये कोणत्या प्रकारचे नेतृत्व अपेक्षित आहे, याची चाचपणी सुरू असताना, लहू बालवडकर यांचा हा सातत्यपूर्ण जनसंपर्क राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर थेट संवाद आणि प्रत्यक्ष कृती यावर आधारित राजकारणाला प्राधान्य देण्याचा त्यांचा प्रयत्न पुढील काळात कोणती दिशा घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


























