पुणे : इनकमिंगने उभारलेली इमारत आता तिकीट वाटपाच्या पायावर उभी आहे.आणि तो पाया सध्या थरथरताना दिसतोय यामुळे जाहीर तिकीट वाटप न करता खुशीच्या मार्गाने तिकीट वाटप करण्यात आले असल्याचे सध्या जोरदार चर्चा आहे.
भाजपने मागील काही काळात जोरदार ‘इनकमिंग’ करत मोठी राजकीय हवा निर्माण केली. विरोधी पक्षांतील इच्छुक, आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते यांना पक्षात सामावून घेत संख्या आणि सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यात आले. मात्र आता हीच इनकमिंग भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
इतक्या मोठ्या संख्येने नेते पक्षात घेतल्यानंतर, सगळ्यांना तिकीट देणे शक्य नाही, ही वस्तुस्थिती समोर आली आहे. तिकीट न मिळाल्यास इच्छुक उमेदवार पक्ष सोडून जातील, बंडखोरी करतील किंवा विरोधात उभे राहतील या भीतीपोटी उमेदवारी निश्चिती मधील अनिश्चितता दिसुन येते.
AB फॉर्म आणि भाजपची अस्वस्थता
आजवरच्या इतिहासात प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की,भाजपला AB फॉर्मचे वाटप लपूनछपून करावे लागत आहे.एकेकाळी शिस्त, स्पष्ट आदेश आणि वेळेवर निर्णयासाठी ओळखल्या जाणाऱ्या पक्षात ही अनिश्चितता आश्चर्यकारक मानली जात आहे. मोठ्या इनकमिंगमुळे तयार केलेली राजकीय हवा फुगा ठरू नये, या भीतीने अनेक इच्छुकांना मुद्दाम लटकत ठेवले जात आहे. आश्वासनांवर अनेक जण थांबवले जात आहेत.
हे चित्र पुण्यापुरते मर्यादित नाही. सेने बरोबर वाटाघाटी चालु असल्याची सबब आता कमजोर पडत चालली आहे. ही परिस्थिती फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही. राज्यातील अनेक शहरे, तालुके आणि महापालिकांमध्ये असाच गोंधळ दिसून येत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय लांबवून बंडखोरीची संधीच मिळू नये, याची काळजी घेतली जात असली तरी, त्याच वेळी दुसरी भावना बळावत आहे.
“पक्षात घेतलं, वापरलं, पण उमेदवारी नाकारून कोंडी केली.”
ही नाराजी केवळ अंतर्गत चर्चेपुरती मर्यादित राहील का,
की ती भाजपच्या विरोधात जाईल, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
पुढील १५ दिवस भाजपसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या नाराजांना कसे सांभाळले जाते, कोणाला काय दिले जाते, कोणाला थांबवले जाते यावरच पुढील राजकीय चित्र अवलंबून असेल.























