मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

पुणे : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे येथील जेडब्लू मेरियट हॉटेल मध्ये आयोजित या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरच्या शुभारंभ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग मंचावर उपस्थित होते.

पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे प्रत्येक किलोमीटरवर शौर्य, परंपरा आणि संस्कृतीच्या कथा अनुभवायला मिळतील. पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातील अग्रगण्य शहर असून, पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य  स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा विश्वास व्यक्त करत, या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही भविष्यातील अनेक शतकांसाठी टिकणाऱ्या मार्गाची सुरुवात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, स्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रम राबवण्यात येणार असून, पर्यटकांना निसर्गासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
‘यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सर्व रायडर्सनी  खिलाडूवृत्तीने स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन केले.

जगभरातील किमान ३५ देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटू, व्यवस्थापक, प्रशिक्षक  आणि सहकारी अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्वागत करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पर्धेच्या भव्य आणि नेटक्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे विशेष अभिनंदन केले. अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करणे हे उल्लेखनीय असून ४३७ किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

See also  पुनित बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोटर्स इन्स्टिट्यूट प्रस्तुत महाराष्ट्र ज्यूदो संघटने तर्फे आयोजित राष्ट्रीय कॅडेट स्पर्धा !!हरयाणा संघाला सर्वसाधारण विजेतेपद; मणिपुर संघाला उपविजेतेपद !!

स्पर्धेसाठी केवळ रस्तेच नव्हे, तर आवश्यक संपूर्ण सुविधा उभारण्यात आल्या असून, कामाच्या अंमलबजावणीचा हा वेग अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांतील प्रशासनातील अनुभवात पाहिलेला हा एखाद्या आयोजनाच्या तयारीचा सर्वोच्च वेग असल्याचे नमूद करत त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रास्ताविक करताना ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ ही स्पर्धा पुणे व महाराष्ट्राच्या क्रीडा, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी मैलाचा दगड ठरेल, असे नमूद केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने केलेल्या तयारीचे त्यांनी कौतुक केले तसेच पुणेकरांनी मोठ्या उत्साहाने या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णी,आमदार उमा खापरे, अमित गोरखे, राहुल कुल, महेश लांडगे, चेतन तुपे, हेमंत रासने, शंकर जगताप, महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार कुमार, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राज्याच्या क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

भारतीय पोशाखाचा असाही गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या वेळी जगभरातून आलेल्या सायकलपटूंचे मंचावर स्वागत करत होते, त्यावेळी सर्वांच्या नजरा सायकलपटूंच्या पोशाखावर खिळल्या होत्या. कुर्ता, पायजमा आणि त्यावर जॅकेट… असा आपल्याकडच्या महोत्सवी पोशाखात सगळे खेळाडू उठून दिसत होते. या क्षणाने भारतीय संस्कृतीचा गौरव जागतिक पातळीवर अधोरेखित झाला. विविध भाषा, देश आणि संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे सायकलिस्ट एकाच पारंपरिक वेशात मंचावर उभे राहिलेले दृश्य हे केवळ औपचारिक स्वागत नव्हते, तर “वसुधैव कुटुंबकम्” या भारतीय विचारधारेचे जिवंत दर्शन होते.कुर्ता,पायजमा आणि त्यावर जॅकेट या पोशाखातून भारतीय परंपरेचा सन्मान राखत या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी आपुलकीने कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या आगळ्या-वेगळ्या स्वागतामुळे भारतीय संस्कृती, आदरातिथ्य आणि जागतिक स्तरावर संवाद साधण्याची क्षमता ठळकपणे पुढे आली. खेळाच्या माध्यमातून संस्कृतींची सांगड घालणारा हा प्रसंग उपस्थितांसह जगभरातील प्रेक्षकांसाठीही स्मरणीय ठरला.