पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला. निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी नियमानुसार आणि चोखपणे बजवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी पुणे विभागातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांच्यासह पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे काम अत्यंत महत्वाचे असून आचारसंहितेचे पालन करण्याची मोठी जबाबदारी या कालावधीत पार पाडावी लागते. यासाठी निवडणूक आयोगाचे कायदे आणि मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक आहेत. त्यांनी जारी केलेल्या नियम पुस्तीका आणि परिपत्रकांचे काळजीपूर्वक वाचन करुन नियमांची निटपणे अंमलबजावणी करावी. आयोगाच्या निर्देशांची सातत्याने माहिती घेवून त्यांचा अभ्यास करावा. निवडणूकीच्या कामात कोणतीही चूक अपेक्षित नाही. निवडणूकीच्या कामात दस्तऐवजीकरण खूप महत्वाचे असून त्याचे काम प्राधान्याने आणि गांभिर्याने करावे.
भारत निवडणूक आयोगाच्या हस्तपुस्तीकांमध्ये ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ या बाबींचा उल्लेख केला आहे. त्यापैकी काय करू नये याची जाणिवपूवर्क वारंवार उजळणी करावी. यापुर्वी चुकीच्या घटना घडल्या आहेत त्याची पुनरावर्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. राजकीय पक्षांची प्रत्येक आठवड्याला बैठक घ्यावी. मतदार यादीतील १०० वर्षाच्या पुढच्या प्रत्येक मतदाराची पडताळणी करावी. निवडणूक विषयक दस्तऐवजांचे निटपणे संकलन आणि जतन करण्यात यावे.
निवडणूकीदरम्यान चुकीच्या पद्धतीने मतदान होणार नाही याकडे लक्ष असणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यात खुप मोठ्या प्रमाणात नव मतदारांची नोंदणी झाली आहे. पोस्ट कार्यालयाकडून पोस्टाने मतदान ओळखपत्र पाठविण्यात येते. पाठवलेले मतदान ओळखपत्र मतदारांना भेटणे आवश्यक असून ते परत येता कामा नये. ५ जानेवारी २०२४ ला मतदान यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यापूर्वी मतदार यादीची पडताळणी करावी. निवडणूकीच्या सर्व पीपीटी मानक स्वरूपात आहेत, त्याचा अभ्यास करावा.
येत्या २९ फेब्रवारी पर्यंत जिल्ह्यात ईव्हीएम प्रात्याक्षिक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. जनजागृतीच्या प्रत्येक ठिकाणी प्रात्याक्षिकाचे फलक लावावेत आणि नागरिकांना यात सहभागी करून घ्यावे. या प्रशिक्षणाचा सर्व अधिकाऱ्यांनी चांगला फायदा करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रशिक्षणात उमेदवारांची निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी पात्रता, नामांकन फार्म भरणे, उमेदवारांचे शिक्षणाची अर्हता, वैधानिक पात्रता, अपात्रता, अर्जाची छाननी, उमेदवारांचे शपथपत्र, उमेदवारांची गुन्हेगार पार्श्वभूमी असतांना नियमानुसार घ्यावयाची काळजी, अर्ज मागे घेणे, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन, खर्च व्यवस्थापन, मतदान केंद्र व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, अतिसंवेदनशिल मतदान केंद्राचे निकष, मतदान साहित्य व्यवस्थापन, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी यांची कर्तव्य आदी विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.
घर ताज्या बातम्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त ठरेल-जिल्हाधिकारी डॉ. राजेश...