पुणे : प्रभाग क्रमांक ८ मधील श्री गणेश परिसरात स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत नगरसेविका सौ. सपना ताई आनंद छाजेड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रभागातील कामाचा श्रीगणेशा केला. पाहणीदरम्यान विविध ठिकाणी कचरा साचलेला आढळून आल्याने त्यांनी तात्काळ याची दखल घेत संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांना विचारणा केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी नगरसेविका सौ. सपना ताई छाजेड म्हणाल्या की, “ज्या प्रकारे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे आपला परिसर आणि प्रभाग स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.” भविष्यात रस्त्यावर कचरा साचणार नाही, यासाठी योग्य नियोजन व नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जागरूक राहावे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन त्यांनी नागरिक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना केले. या प्रसंगी आनंद छाजेड (अध्यक्ष, उत्तर शिवाजीनगर मंडल – भाजपा) यांच्यासह नागरी व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी प्रभागासाठी सर्वांनी मिळून काम करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.























