पुणे : हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी निवडणूक प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. अचूक नियोजन, तांत्रिक दक्षता आणि वेळेवर अंमलबजावणी यावर भर देत निवडणूक कार्यालयामार्फत प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली मतदार ओळख तपासणी, गुप्त मतदान प्रक्रिया तसेच मतदान केंद्रांवरील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा त्रुटीविरहित पार पाडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) यंत्रणांच्या प्रभावी वापरासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले आहे. संभाव्य तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी पूर्वतयारीच्या स्वरूपात विशेष रणनीती आखण्यात आल्या आहेत.
मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी प्रमोद भांड यांनी त्यांच्या प्रशासकीय अनुभवाच्या आधारे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मनुष्यबळ विभागात धम्मदिप सातकर,भूमेश मसराम, अश्विनी कुलकर्णी, साहिर सय्यद,प्रियांका शिंगाडे, सरस्वती पोंदे आणि स्मिता बगाटे हे अधिकारी व कर्मचारी समन्वयाने कार्यरत असून प्रशिक्षण, नियोजन, नियुक्ती तसेच अंमलबजावणीची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत आहेत. मनुष्यबळ व्यवस्थापनात महिला अधिकाऱ्यांचे योगदानही उल्लेखनीय ठरले असून त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अचूकता आणि शिस्त राखण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
संघटित, नियोजित व समर्पित प्रयत्नांमुळे निवडणूक कार्यालय अधिक सक्षम झाले असून हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शांततापूर्ण आणि यशस्वीपणे पार पडतील, असा विश्वास निवडणूक प्रशासनाने व्यक्त केला आहे.
























