पुणे : कॅपेक्स (भांडवली खर्च) खर्चात लक्षणीय वाढ, फिस्कल डेफिसिएट कमी करण्यावर भर आणि कर्ज–जीडीपी गुणोत्तर अधिक सक्षम करणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प असल्याचे मत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
भारतामधील उत्पादनक्षमता वाढवणे, पायाभूत सुविधांमध्ये व्यापक सुधारणा करणे आणि त्यातून रोजगारनिर्मितीला चालना देणे, हा या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांची कौशल्ये व क्षमता वाढवून त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा, तसेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्या म्हणाल्या.
शहरे व ग्रामीण भागांचा समतोल विकास साधणाऱ्या तरतुदींसह शेती, मच्छीमार व्यवसाय, दुग्ध व्यवसाय व त्यास पूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. महिलांचा सर्वांगीण विकास व सुरक्षितता सुनिश्चित करणाऱ्या योजनांमुळे महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळेल, असेही डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.
यंदाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी संरक्षण खात्याशी संबंधित साहित्यनिर्मिती, नद्यांमधील जलवाहतूक विकास, रेअर अर्थ मटेरियल कॉरिडॉर, सेमीकंडक्टर उद्योगाला चालना, सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स, बायोफार्मा क्षेत्राचा विकास तसेच डेटा सेंटर हब उभारणी यांचा विशेष उल्लेख केला. एकूणच दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य, औद्योगिक प्रगती आणि समावेशक विकास साधणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत खा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.






















