पुणे : राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल च्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांना सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल “यशवंतराव चव्हाण सहकार महर्षी पुरस्कार” महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व राष्ट्रगीत म्हणून केली तसेच सांस्कृतिक कला सादर केली.
ज्ञानेश्वर तापकीर यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले की, योगीराज सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत निःस्वार्थी भावनेतून जपलेली आहे. संस्थेचे सामाजिक कार्य व आर्थिक क्षेत्रातील प्रगतीचा विचार करून राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने राज्यातील “आदर्श पतसंस्था” म्हणून गौरव केला आहे. संस्थेला केलेल्या कामाची पावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली. हे सर्व समाजहिताचे काम करत असताना मला माझ्या संस्थेच्या सहकारी संचालक मंडळाचे कायम सहकार्य लाभते म्हणून हे सर्व करू शकलो असे मला वाटते. आजचा मिळालेला पुरस्कार मी प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांच्या पायावर समर्पित करतो असेही यावेळी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक विकास साने, यश साने, नगरसेविका संगीता ताम्हाणे, सोनल मोरे, प्रभाकर चव्हाण, वैशाली सावळेकर, पालक कमिटीच्या अध्यक्षा रेखा घोडे, विनायक मोरे, योगीराज पतसंस्थेचे शाखाध्यक्ष आप्पाजी सायकर, माजी संचालक वसंत माळी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश वाघमोडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका रंजना आव्हाड व सई पांचाळ यांनी केले तर आलेल्या सर्वांचे आभार सत्यवान वाघमोडे यांनी मानले.
























