लोणी काळभोर : परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या स्थानिक पातळीवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होते.
स्वच्छ भारत मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वच्छता आणि नदी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना, लोणी काळभोर येथे मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून तो जाळण्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या पुणे शहराला लागून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत. तसेच सदर ग्रामपंचायती या पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे या भागामध्ये शहरीकरण वाढते आहे. सदर महामार्गावरील या ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर हॉटेल इंडस्ट्री, मंगल कार्यालये इत्यादी आहेत. त्यामुळे सदर ग्रामपंचायतींच्या हद्दीत दररोज मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा उत्पन्न होतो. परंतु सदर ठिकाणी कचरा संकलनासाठी जागा तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिक प्रकल्प आजमितीस उपलब्ध नाही.
त्यामुळे नाइलाजास्तव दररोज सुमारे ३० ते ३५ ट्रॉलींहून अधिक कचरा थेट नदीपात्रात आणून टाकला जातो. परिणामी नदीपात्रात आता कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
यापूर्वी देखील या साचलेल्या कचऱ्याला अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात विषारी धूर निर्माण झाला. हा धूर परिसरात पसरल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. विशेषतः या भागात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने हजारो विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. डोळ्यांची जळजळ, घसा दुखणे आणि श्वसनाच्या तक्रारी वाढल्याचे नागरिकांनी सांगितले.
नदीपात्रात कचरा टाकल्यामुळे केवळ वायुप्रदूषणच नव्हे, तर जलप्रदूषणही वाढत असून मुळा-मुठा नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. नदीपात्रातील कचऱ्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण, दुर्गंधी इत्यादींमुळे पुणे शहराची तसेच महाराष्ट्राची प्रतिमाही मलीन होत आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी वेगळी जागा हवी
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाश्वत कचरा व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाढत्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जिल्हा प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने हस्तक्षेप करावा. तसेच पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्रात अवैधरित्या थेट कचरा टाकणे व तो नष्ट करण्यासाठी कचरा जाळणे हे त्वरित थांबवण्यात यावे. त्यामुळे लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींसाठी शासनाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यावरील प्रक्रियेसाठी तातडीने वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
























