पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण कामांवर प्रश्नचिन्ह; ११४५ कोटी खर्चाबाबत सविस्तर चौकशीची मागणी

पुणे : Pune Municipal Corporation च्या प्रशासकीय कारभाराच्या काळात मलनिस्सारण आणि संबंधित प्रकल्पांवर झालेल्या खर्चाबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी स्थायी समितीकडे केली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि सदस्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकातील आकडे तपासताना काही बाबी लक्षात आल्या आहेत. अंदाजपत्रकानुसार मलनिस्सारणासाठी ५७१.९५ कोटी रुपये आणि मलनिस्सारण प्रकल्पांसाठी ५७४ कोटी रुपये, असे एकूण ११४५.९५ कोटी रुपये खर्च झाल्याचे नमूद आहे.

मात्र ड्रेनेज प्रकल्प विभागाने ११ गावांसह नंतर समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी तयार केलेल्या मास्टर प्लॅननुसार मोठ्या प्रमाणावर कामे झाली असतानाही अनेक ठिकाणी ड्रेनेजची समस्या कायम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनेक नाले आजही मैलापाण्याने तुडुंब भरून वाहत असल्याने प्रत्यक्षात नेमकी कोणती कामे झाली, याची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच या प्रकल्पांतर्गत ड्रेनेज लाईनचे नेटवर्क योग्य प्रकारे जोडले गेले आहे की नाही, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सल्लागारांनी तयार केलेला सविस्तर अहवाल, टेंडरची प्रत, प्रत्यक्ष जागेवर झालेले काम तसेच अधिकाऱ्यांनी तपासून तयार केलेली बिले यांची स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय काही कंत्राटदार आणि अनेक वर्षे त्या खात्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये संगनमत झाले आहे का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एका कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांकडे प्रकल्पाच्या नावाखाली कंत्राटदारांच्या इनोव्हा गाड्या वापरात असल्याची माहिती मिळत असल्याने त्याबाबतही चौकशी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, एसडी (SD) अंतर्गत सुरू असलेली कामे नेमकी कधी पूर्ण होणार, याचाही सविस्तर अहवाल प्रशासनाकडून मागवावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.

See also  पुणे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस