मोरे विद्यालय परिसरात नागरिकांचा संताप; अतिक्रमण विभागाच्या भूमिकेवर सवाल
पुणे : कोथरूड परिसरातील मोरे विद्यालय जवळील परिसरात अनधिकृत टपऱ्या व दुकाने उभारण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी येथे लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतरही अतिक्रमणावर ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील सर्व्हे नंबर 42/2 मध्ये दशभुजा गणपती मंदिराजवळ मूळ परवाना असलेले दुकान आहे. मात्र, कोविड काळात सामाजिक अंतर राखण्यासाठी ते दुकान तात्पुरत्या स्वरूपात सर्व्हे नंबर 48 मध्ये मामा साहेब मोहोळ शिक्षण संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्यावर हलवण्यात आले होते.
परंतु कालांतराने त्या दुकानाच्या आजूबाजूला अनेक अनधिकृत टपऱ्या उभारण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या टपऱ्यांमधून सिगारेटची अनधिकृत विक्री सुरू असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमागे याच कारणाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या परिसरात अनेक शाळा व शैक्षणिक संस्था असल्याने पालकांनीही या अनधिकृत टपऱ्यांविरोधात तक्रारी केल्या आहेत. मात्र वारंवार तक्रारी करूनही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
“मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. रस्त्यावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या व दुकानांवर तातडीने कारवाई करून परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

























