पुणे : महिला दिनानिमित्त नवचैतन्य हास्य क्लब, वाकेश्वर शाखा क्रमांक ११५ तर्फे परिसरातील महिला स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यात आला. सकाळी कामाला लागण्यापूर्वी १८ महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना आमंत्रित करून त्यांचा गुलाब फुले देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात लोकायत संस्थेच्या वर्षा सपकाळ यांनी भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या अधिकारांबाबत मार्गदर्शन केले. समानता, स्वातंत्र्य आणि सन्मान ही केवळ संविधानातील शब्द नसून स्त्रीच्या जगण्याची मूलभूत तत्त्वे असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना दिलेले अधिकार समाजाने मान्य करून त्यांचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, स्त्रीच्या निर्णय स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि समानतेसाठी संघटित होणे हेच संविधानाच्या मूल्यांचे प्रत्यक्ष पालन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी संविधानाच्या ओव्या म्हणत महिलांच्या सन्मानाचा जागर केला.
यावेळी जहागीरदार सरांनी ग्रामीण भागातील एका कवीची कविता सादर केली. छाया बंडगर यांनी महिलांना सकाळी उठल्यानंतर मोबाईल पाहण्यापेक्षा सकारात्मक विचारांचे पाच मंत्र म्हणण्याचा सल्ला दिला. “मी खुश आहे, मी आनंदी आहे” अशा सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करण्याचे त्यांनी सांगितले.
क्लबचे खजिनदार विजय कुलकर्णी यांनी उपस्थित सर्व महिलांना गुलाबाची फुले देऊन त्यांचा सन्मान केला. हास्य क्लबच्या अध्यक्षा प्रतिभा त्रिमंदे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना घरचा नाश्ता दिला. कार्यक्रमानंतर चहापानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन वासंती येळवंडे यांनी केले असून सूत्रसंचालन दीपाली कात्रे यांनी केले.























