मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती अद्याप झालेली नसल्याच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन स्मरणपत्र सादर केले.
महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात २०२४ च्या हिवाळी अधिवेशनातच विरोधी पक्षनेत्याची निवड होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप ही नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या स्मरणपत्राद्वारे करण्यात आली.
या भेटीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे विधीमंडळ गटनेते आदित्य ठाकरे, विधानसभा गटनेते भास्कर जाधव, विधानपरिषद गटनेते अनिल परब तसेच आमदार अजय चौधरी, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, महेश सावंत, कैलास पाटील आणि संजय देरकर उपस्थित होते.
लोकशाही व्यवस्थेत विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ही नियुक्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली























