भिडे पूल परिसरात नदीपात्रात भराव; पावसाळ्यात पूरधोक्याची भीती – कारवाईची मागणी

पुणे : शहरातील भिडे पूल परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कामामुळे नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण होत असून येत्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंनी शेकडो ट्रकद्वारे टाकण्यात आलेल्या माती व राडारोड्यामुळे भिडे पुलाच्या मोऱ्या जवळपास बंद झाल्याची स्थिती आहे. परिणामी नदीचा नैसर्गिक प्रवाह अरुंद होत असून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे.

नागरिक कार्यकर्ते सचिन बहिरट आणि बाबा सय्यद यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “एका दिवसाच्या पावसात पुण्याची दैना होत असताना, नदीपात्रात भराव टाकून मानवनिर्मित पूरस्थिती निर्माण करण्याचा हा प्रकार धोकादायक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, पुण्यात राबवण्यात येत असलेल्या नदी सुधार प्रकल्पावरही त्यांनी टीका केली आहे. “नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली ४२ किमी नदीपात्र अरुंद करण्याचे काम सुरू असून, यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होऊ शकते,” असा इशारा त्यांनी दिला.

पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन व संबंधित राजकीय नेत्यांनी घ्यावी, तसेच तत्काळ या कामांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, “नदी सुधार प्रकल्पाऐवजी प्रशासन सुधार होणार का?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

See also  नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे - मुरलीधरअण्णा मोहोळ