सुतारवाडीत स्कूल बसच्या बॅटऱ्या चोरी

पुणे : सुतारवाडी परिसरात काल (दि. ३ एप्रिल) रात्री मोठ्या प्रमाणात वाहन चोरीची घटना घडली असून, तब्बल १० स्कूल बसमधील बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश सुतार यांच्या दोन स्कूल बस, भरत चौधरी यांची एक बस तसेच शंकर सुतार यांची एक बस अशा एकूण १० बसमधील बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या. संबंधित सर्व बस आयशर कंपनीच्या असून काल सुट्टी असल्यामुळे त्या पार्किंगमध्ये उभ्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस स्टेशन तसेच पाषाण पोलीस चौकी येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुतारवाडी परिसरात यापूर्वीही वाहन चोरीच्या घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले असून, हा प्रकार गंभीर असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. परिसरात पोलीस गस्त वाढवावी आणि चोरट्यांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे सुतारवाडीतील वाहन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

See also  HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले