पुणे : भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याअंतर्गत क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे वैकुंठ स्मशानभूमी तसेच इतर सामाजिक संस्थांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दिली.
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेल्यानंतर तेथील स्पीकर यंत्रणा नादुरुस्त असल्यामुळे श्रद्धांजली अर्पण करताना मान्यवरांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. याची दखल घेत क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे वैकुंठ विद्युतदाहिनी येथे स्पीकर सेट भेट देण्यात आला. या स्पीकर सेटमध्ये दोन कॉर्डलेस माईक, चार्जिंग वायर, रिमोट व ब्लूटूथ सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर सुलभ होणार आहे.
तसेच, उमेद फाउंडेशनच्या दारवली येथील बालक-पालक प्रकल्पासाठी २५ खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. या साहित्याचे स्वीकृती संस्थेचे प्रतिनिधी राकेश सणस यांनी दिली. याशिवाय सेवाव्रत फाउंडेशनच्या माध्यमातून मावळे आळी, गोसावी वस्ती येथील “वृंदावन शैक्षणिक व सर्वांगीण विकास प्रकल्पा”स सतरंज्याही भेट देण्यात आल्या.
या प्रसंगी फाउंडेशनच्या विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश कालेकर, उपअभियंता जयदीप अडसूळ तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप खर्डेकर यांनी सांगितले की, सर्वच ठिकाणी प्रशासन पोहोचू शकत नाही. त्यामुळे सामाजिक संस्थांनी सण-उत्सव साजरे करताना काही निधी समाजोपयोगी कार्यासाठी राखून ठेवणे गरजेचे आहे.
मंजुश्री खर्डेकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आमची खरी ऊर्जा आहे. अशा उपक्रमांमुळे अधिकाधिक समाजोपयोगी काम करण्याची प्रेरणा मिळते.”
मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश कालेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत वैकुंठ स्मशानभूमी व संबंधित संस्थांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. दरम्यान, विद्युतदाहिनीतील कर्मचाऱ्यांनी स्पीकर यंत्रणेची योग्य निगा राखून श्रद्धांजली कार्यक्रमांसाठी तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.























