भाजपा नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या नेतृत्वात प्रभागातील अतिक्रमणाविरोधात तीव्र आंदोलन

कोथरूड : प्रभाग क्रमांक १० मधील वाढते अतिक्रमण, अनधिकृत टपऱ्या, हातगाडे, अंडा-भुर्जी गाड्या तसेच आर.एम.सी. प्लांट यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आज नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेविका रूपाली सचिन पवार उपस्थित होत्या.

या आंदोलनादरम्यान प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात अनधिकृत टपऱ्या व हातगाडे लावण्यात आले. प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला.

अतिक्रमणावर तातडीने कारवाई न झाल्यास कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाला कुलूप लावून कामकाज ठप्प करण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले.

सहाय्यक आयुक्त श्री. जाधव यांनी तात्काळ दखल घेत बांधकाम विभागासह संबंधित सर्व विभागांची बैठक बोलावली असून, पुढील ७ दिवसांत अतिक्रमण, अनधिकृत टपऱ्या, हातगाडे, अंडा-भुर्जी गाड्या तसेच आर.एम.सी. प्लांट हटविण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

नागरिकांच्या हक्कांसाठी उभे राहणारे हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याची भावना प्रभागात व्यक्त होत आहे.

See also  ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद