पाषाण तलाव प्रकरणी मोठी कारवाई : तीन अधिकारी निलंबित

पुणे : पाषाण तलाव परिसरातील गंभीर पर्यावरणीय परिस्थितीमुळे पुणे महानगरपालिकेने तातडीची मोठी कारवाई करत तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी १० एप्रिल २०२६ रोजी तलाव परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली.
पाहणीदरम्यान संबंधित मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशुद्ध मैलापाणी थेट तलावात सोडले जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून तलावातील पाणी दूषित झाले आहे. याच परिणामी मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून आले असून ही बाब पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत गंभीर मानली जात आहे.

या घटनेची तात्काळ दखल घेत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मुख्य अभियंता (मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभाग) जगदीश खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
तसेच,अजयकुमार दत्तात्रय वायसे (कार्यकारी अभियंता),
विनायक चोपडे (आरोग्य निरीक्षक),
विजय भोईर (विभागीय आरोग्य निरीक्षक) यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६(२)(क) अंतर्गत खातेनिहाय चौकशी करत निलंबित करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेकडून या प्रकरणात तातडीने सुधारणा उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. अशा घटनांबाबत ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवले जात असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

See also  गरजू विद्यार्थिनींना 'जिव्हाळ्या'चा पोषक आहार नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार