पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता, तो प्रत्यक्ष सामाजिक प्रगतीसाठी अंमलात आणणे आवश्यक आहे. आजच्या काळात केवळ स्मारके किंवा फ्लेक्स लावण्यापेक्षा समाजातील तरुण पिढीला, विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि उद्योगासाठी प्रत्यक्ष मदत करणे हीच महामानवाला खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण, पुणे विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रम तसेच सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, राज्याच्या समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, विभागाच्या सहआयुक्त (शिक्षण) प्रमोद जाधव, प्रादेशिक उपआयुक्त वंदना कोचुरे, सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.
श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या, महामानवांचे कार्य, त्यांचे विचार, आपल्याकडून अपेक्षित असलेले वर्तवणूक तसेच समाज कल्याण विभागामार्फत विविध योजनांची माहिती दिली.
श्री. जाधव यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतक-यांसाठी केलेले कार्य” या विषयावर व्याख्यान दिले.
श्री. लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरीकांना शुभेच्छा संदेश देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचार घेवून जीवनाची वाटचाल यशस्वी करावी, असे आवाहन केले.
यावेळी समाज कल्याण विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख व गृहपाल तसेच विद्यार्थी- विद्यार्थींनी, नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अॅट्रॉसिटी अंतर्गत प्रकरणातील मयत व्यक्तींच्या १९ वारसांना शासकीय नोकरी प्रदान करण्याबाबतचे आदेश, तसेच स्टॅंड अप इंडिया, स्वाधार व शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी सामजिक न्याय मंत्री माधुरी मिसाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपआयुक्त (नियोजन) विजयकुमार गायकवाड, प्रादेशिक उपआयुक्त वंदना कोचुरे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त रविंद्र कदम पाटील, सहायक आयुक्त विशाल लोंढे, श्री. मारकड आदी उपस्थित होते.























