श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट जय गणेश रुग्णसेवा अभियान

पुणे : रखरखीत उन्हात वाहतूक पोलीसांच्या डोळ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत वाहतूक पोलीसांना आय ड्रॉप्स देऊन त्यांची नेत्र तपासणी ही मोफत करण्यात येत आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

सध्या पुण्याचे तापमान ४०अंश सेल्सिअस च्या आसपास आहे. वाहतूक पोलीसांना अशा रखरखीत उन्हात थांबून ड्यूटी करावी लागत असल्याने त्यांना डोळ्यांचे आजार, रक्तदाबाचा त्रास होतो. हे लक्षात घेऊन वाहतूक पोलीस खात्याच्या सहकार्याने ट्रस्टने मोहीम हाती घेतली. या मोहीमेत डॉ.फाल्गुनी जपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक मुख्य चौकांमध्ये जाऊन वाहतूक पोलीसांची नेत्र तपासणी आणि रक्तदाब तपासणी करतात. उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांना आय ड्रॉप्सचे वाटप केले जाते. या मोहीमेला वाहतूक पोलीसांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

सध्या असलेला उन्हाचा तडाखा कमी होईपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. या तपासणीत ज्या पोलीसांच्या डोळ्यांमध्ये दोष आढळले आहेत, त्यांच्यावर ट्रस्ट तर्फे उपचारही केले जातील, असे रासने यांनी सांगितले.

See also  शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूड येथे शिवजयंती निमित्त दुर्मिळ शिवकालीन ऐतिहासिक शास्त्र प्रदर्शनाचे आयोजन