पुणे : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महापालिकेत बैठक घेतली.
पुण्यातील प्रकल्प मार्गी लागावेत, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे. मुळा-मुठा नदी सुधार योजना, पाणीपुरवठा वितरणासाठी पाण्याच्या टाक्यांची उभारणी, बीआरटी योजना, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना मूलभूत सुधारणा या कामांना गती मिळालेली नाही, अशा तक्रारी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या आहेत.
शहराच्या अनेक भागांमध्ये रोज टॅंकर ने पाणीपुरवठा करावा लागतो, याबाबत खुद्द भाजप नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत.
नगरविकास राज्यमंत्री मिसाळ यांनी कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या त्यामागे हीच कारणे आहेत. पाणीपुरवठा वितरणाला प्राधान्य द्यावे, असा आग्रह महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा आहे तर, वाहतुक समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन महापौर मंजुषा नागपुरे यांनी एका मुलाखतीत केले आहे. राज्यमंत्री या नात्याने दोन्ही समस्यांचा मेळ घालून मार्ग काढण्याचे काम माधुरी मिसाळ यांना करावे लागणार आहे.
११ गावांचा विकास आराखडा तयार होऊन लवकर मंजूर व्हावा, अशी अपेक्षा पुणेकरांची आहे. शहराचा विकास आराखडा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिला, तशी अवस्था ११ गावांची होऊ नये.
















