जागतिक परिचारिका दिनानिमित्त फ्लॉरेन्स नाईट्रिंगेल पुरस्कार २०२६  तनुजा रुपेश रावळ यांना प्रदान

पुणे : जागतिक परिचारिका दिनानिमित्त पुणे शहर रुग्ण सेवा समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा “फ्लॉरेन्स नाईट्रिंगेल पुरस्कार २०२६” यंदा पुणे महानगरपालिकेतील PHN प्रभारी सौ. तनुजा रूपेश रावळ यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभ पुण्यातील दळवी हॉस्पिटल येथे उत्साहात संपन्न झाला.
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमारजी गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे शहर रुग्ण सेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा, उपाध्यक्ष संभाजी शिंदे, सरचिटणीस प्रशांत टेके, अनिल भिसे तसेच निलेश मोरे, गणेश सारवान, सल्वराज ॲन्थोनी, संदीप भिसे, विजय सोनिगरा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे कृष्णकुमारजी गोयल म्हणाले की, “परिचारिका आपल्या कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असतात. कोरोना काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिलेली सेवा जगाने अनुभवली आहे. त्यांचे कार्य अत्यंत महान आणि प्रेरणादायी आहे.”

याच कार्यक्रमात शुभांगी वाघमारे, सना शेख, शितल बिडकर आणि तेजस्वी गायकवाड या प्रमुख परिचारिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.पुणे शहरातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या परिचारिकांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. गेली २६ वर्षे हा उपक्रम अखंडपणे राबविला जात असून समिती विविध सामाजिक व रुग्णसेवेचे उपक्रम सातत्याने राबवत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे मनपाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सल्वराज ॲन्थोनी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र भुतडा यांनी मानले.

See also  शहारात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा – सुनील माने ; बोपोडीत मध्यरात्री सशस्त्र चंदनचोरी