जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे : जागतिक सायकल दिनानिमित्त महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित उपक्रमाला सुमारे ३ हजार ५०० हून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात सर्वांसाठी २५ किमी व ५० किमी अंतराच्या सायकल फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘अस्मिता – खेलो इंडिया’ अंतर्गत महिला व मुलींसाठी विशेष ५ किमी, ७ किमी आणि १० किमी गट आयोजित करण्यात आले. शरीर तंदुरुस्त, पर्यावरण संवर्धन आणि सायकल संस्कृतीचा प्रसार हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी भारतीय क्रीडा प्राधिकरण व  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, महाराष्ट्र सायकल असोसिएशन आणि लोहा फाउंडेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

या प्रसंगी सायकल रॅलीस महापौर मंजूषा नागपुरे, अर्जुन पुरस्कारार्थी शांताराम जाधव यांनी झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल उपसंचालक संजय सबनीस, डाकार रॅली वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धक संजय टकले, जीएम – सेल्स अँड मार्केटिंग, अवोन सायकलचे व्यवस्थापक सुलेख कौशिक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सायकलिंग फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे अभिजित मोहिते,  क्रीडा प्रबोधनी बालेवाडीचे प्राचार्य तथा राज्य क्रीडा मार्गदर्शक दीपाली पाटील तसेच फीट इंडियाचे सदिच्छादूत कु. दीक्षा आणि कु. स्वप्नाली उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी सायकलिंगच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत वाहतुकीचा संदेश देत अशा उपक्रमांची आवश्यक असल्याचे अधोरेखित केली.यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते अस्मिता सायकल स्पर्धेतील विजेत्या मुलींना पदक व सोडत पद्धतीने सायकली देण्यात आल्या.

या उपक्रमाला लोहा फाउंडेशन, सायकलिंग संघटना महाराष्ट्र, देशी फार्म, मॅक्स प्रोटीन, अवोन सायकल्स, ऑक्सरीच, फुडस्ट्रॉंग, कोकोअ मेल्स, एपीसीसीआय  नागोर, अस्मिता  फाउंडेशन रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१, बायसिकल मेयर ऑफ पिंपरी चिंचवड तसेच इतर संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

See also  मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजनेकरीता जिल्ह्यात ९ लाखाहून अधिक अर्ज प्राप्त