पौड : दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, मुळशी यांच्या वतीने गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी पौड येथे शांततापूर्ण धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. एस.टी. स्टँड, पौड येथून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मुळशी तालुकाध्यक्ष प्रशांत भाऊ कांबळे यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा महासचिव अरुण कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन भाऊ ओव्हाळ, जिल्हा सचिव अनिल निकाळजे, ज्येष्ठ नेते गुलाब गजरमल, भारतीय बौद्ध महासभा मुळशी तालुका अध्यक्ष शशिकांत निकाळजे, रिपब्लिकन सेना अध्यक्ष प्रवीण वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवकाध्यक्ष किरण कांबळे, मुठा खोरे अध्यक्ष किरण हि. कांबळे, आंबवणे गण अध्यक्ष साई निकाळजे, कासार आंबोलीचे सरपंच ॲड. स्वप्निल कांबळे, महिला महासचिव रेखाताई चिचखेडे, नीता सुरवसे, मीनाताई गेदाम, सचिव अभिषेक केदारी, उपाध्यक्ष प्रमोद चिचखेडे, सोशल मीडिया उपाध्यक्ष गणेश निकाळजे, मोना जांभुरे, भोडे सिद्धेश्वर गावचे सरपंच दीपक कांबळे, नेते तुषार गायकवाड तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच देशभरात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर तातडीने आळा घालावा, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, शिक्षण व्यवस्थेत सर्वंकष सुधारणा करून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला. विद्यार्थ्यांच्या न्याय, सुरक्षितता आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.















