कृष्णा पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत – मुख्यमंत्री

मुंबई : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ काढण्यासाठी तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रीया व अन्य उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलावीत असे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहवर झालेल्या बैठकीत दिले.

कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठीचा नगरोत्थान योजनेतील १०० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध व्हावा व इचलकरंजी महापालिकेच्या नवीन सभागृहासाठी आणि महापालिकेसाठी अंशदान तरतुदीबाबत ही कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

वाळवा तालुक्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. तसेच पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी व इचलकरंजी महापालिकेने सांडपाणी प्रक्रीयेकरिता वाढीव क्षमतेच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करावा. विशेषतः पाणी पुनर्वापराच्या प्रकल्पाबाबतही विचार करावा. बायो-टॉयलेटसारख्या अभिनव पर्यायांचाही शक्य तिथे अवलंब करावा.

पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने एक धोरण निश्चित करावे. यातून नदी पात्राचे खोलीकरण, रुंदीकरण होईल तसेच प्रवाहाचा मार्गही मोकळा होईल. या कामासाठी जलसंपदा विभागाचा यांत्रिकी विभाग आणि जोडीला स्वयंस्फुर्तीने सहभाग देऊ इच्छिणाऱ्या खासगी यंत्र धारकांचाही सहभाग घ्यावा. त्यासाठी डिझेलची उपलब्धता आणि देखभाल, दुरूस्तीसाठी आदी निधीबाबतही कार्यपद्धती निश्चित करावी अशा सूचना दिल्या.

कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेच्या महापूरामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या मागणीवरही नगरविकास विभागाने तत्काळ कार्यवाही करावी. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय संकुलासाठी शेंडा पार्क येथील आरोग्य व कृषि विभागाची जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी बैठकीत दिले.

कोल्हापूर शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील परीख पूल येथील राजारामपूरी आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसर यांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाबाबतही महापालिकेने व्यवहार्यता व विविध पर्याय तपासून प्रकल्प आराखडा सादर करावा तसेच कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्कीट बेंच सुरु करण्याच्या मागणीबाबतही पाठपुरावा सुरु असल्याचे सांगत, त्याबाबतही लवकरच सकारात्मक पाऊल पडेल,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

See also  वारकऱ्यांची जाहिर माफी मागा , आप युवक शहराध्यक्ष रविराज काळे

हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकाराने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माणगाव अस्पृश्य परिषदेच्या आयोजनाचा शतकोत्सव साजरा करण्यासाठी सुनियोजन करण्याचे तसेच नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाबाबतही संबंधित विभागांनी समन्वयाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले.