बेपत्ता  मृत्यूचे गुड २५ दिवसांनी उकलण्यात पोलिसांना यश

खडकवासला : वेल्हे तालुक्यातील दुर्गम पाबे घाटात महावितरणच्या तारा चोरण्यासाठी टॉवरवर चढलेल्या तरुणाचा पडून  मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत सोबत असलेल्या  दोघा साथीदारांनी मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह घाटात कपारीत दुर्गम ठिकाणी  पुरला होता. २५ दिवसांनी मृत्यूचे गुढ उकलण्यात आणि मृतदेह शोधण्यात पुणे शहर  पोलीस, ग्रामीण पोलीस आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन समितीला यश आले आहे.


बसवराज पुरंत मॅगीनमनी (वय २२, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या नातेवाईकांनी   १० जुलै २०२४ रोजी बसवराज बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली होती. तांत्रिक तपासात सिंहगड रोड पोलीसाना बसवराजचे  शेवटचे लोकेशन पाबे घाटाच्या परिसरात मिळत होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसवराज बरोबर चोरी करताना रुपेश अरुण येनपुरे आणि सौरभ बापू रेणुसे हे दोन साथीदार होते. टॉवरवर चढून टॉवरवरील तारा कापताना बसवराज दीडशे  फुटावरून खाली  पडून त्याचा मृत्यू झाला. घाबरलेल्या साथीदारांनी त्याचा मृतदेह पाबे घाटातील दुर्गम ठिकाणी पुरला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या दोघां साथीदारांना ताब्यात घेतले होते.  त्यांना घेऊन सिंहगड रोड पोलीसांनी  शुक्रवारी सायंकाळी उशिरा घटनास्थळी जाऊन बसवराजच्या मृतदेहाचा शोध घेतला. त्यांच्याबरोबर वेल्हे पोलीस ठाण्याचे पथक आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन समितीचे पथक बरोबर होते. हवेली आपत्ती व्यवस्थापन समितीच्या  पथकातील तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, गुलाब भोंडेकर, संजय चोरगे यांनी पाबे घाट परिसरात दुर्गम ठिकाणी पुरलेला मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यास यश मिळविले.  वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर यांनी सांगितले की पुरलेली जागा शोधण्यातच मध्य रात्र झाली होती. डोंगर कपारीत पुरलेला मृतदेह दोरखंडाच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन पथकाने बाहेर काढला असे सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांनी सांगितले. निकेत निंबाळकर पुढील तपास करत आहेत.

See also  कोकाटे तालिम मंडळाचावतीने चित्रकला स्पर्धा