पुणे : देहरादून, उत्तराखंड येथे काल झालेल्या दुसऱ्या ‘हे-बॉल राष्ट्रीय अजिंक्यपद २०२६ स्पर्धेत पुण्याच्या व १५ वर्षीय आरव संचेती याने जुनिअर गटाचे (१९ वर्षाखालील) विजेतेपद राखले. सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून अशा प्रकारची कामगिरी करणारा आरव हा पुण्यासह महाराष्ट्रातील एकमेव स्नुकरपटू ठरला आहे. आरवचे हे एकूण नववे राष्ट्रीय विजेतेपद ठरले आहे.
देहरादून येथील हॉटेल प्राईड प्रिमिअर सॉलिटर, उत्तराखंड येथे बिलीयर्डस् आणि स्नुकर फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली ही स्पर्धा सुरू आहे. आरव याने सामन्याची सुरूवात वादळी वेगाने केली आणि ‘रेस-टू-६’ (६ फ्रेम्स् जिंकण्याची शर्यत) असलेल्या या अंतिम सामन्यात ३-० अशी झटपट आघाडी घेतली. मात्र मुस्तफा याने शानदार पुनरागमन करताना सलग दोन फ्रेम्स् जिंकत (३-२) सामन्यात चुरस निर्माण केली. सहाव्या फ्रेममध्ये आरवकडे ४-२ अशी आघाडी घेण्याची संधी असताना उजव्या कोपऱ्यातील पॉकेटमध्ये ‘ब्लॅक बॉल’ टाकण्याची सोपी संधी गमावली. मुस्तफाने या संधीचा पुरेपूर फायदा घेत फ्रेम खिशात घालत सामन्यात ३-३ अशी बरोबरी निर्माण केली. त्यानंतरच्या दोन फ्रेम्स् दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक-एक फ्रेम जिंकली. नवव्या फ्रेममध्ये आरव याने शानदार पॉटींग करून सामन्यात ५-४ अशी आघाडी घेतली. दहाव्या फ्रेममध्ये आरव याने आत्मविश्वासाने खेळ करून सर्व चेंडू ‘क्लिअर’ करत ६-४ असे विजेतेपद पटकावले.
आरवचे हे २०२६ वर्षातील पाचवे राष्ट्रीय विजेतेपद ठरले आहे. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या ९२ व्या राष्ट्रीय बिलीयर्डस् आणि स्नुकर अजिंक्यपद २०२५-२६ स्पर्धेत आरव सचिन संचेती याने ऐतिहासिक कामगिरी करत ज्युनिअर (२१ वर्षाखालील) स्नुकर, सब-ज्युनिअर (१७ वर्षाखालील) बिलीयर्डस् आणि स्नुकर या तिनही गटामध्ये विजेतेपद संपादन करून तिहेरी मुकूट पटकावला होता. महाराष्ट्रा राज्यासह पुण्यामध्ये केवळ १५ वर्ष वय असताना २१ वर्षाखालील गटाचे आणि १७ वर्षाखालील गटाचे विजेतेपद संपादन करणारा तो एकमेव खेळाडू ठरला होता. तसेच केवळ १५ वर्ष असताना या ज्युनिअर स्नुकर गटाचे विजेतेपद मिळणारा आरव देशातील पहिला खेळाडू ठरला होता. ऑगस्ट २०२५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या पहिल्या हे-बॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आरव याने ज्युनिअर (१९ वर्षाखालील) गटाचे विजेतेपदही मिळवले होते.
आरव हा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्नुकर आणि बिलीयर्डस् खेळाडू सचिन संचेती यांचा मुलगा असून आपल्या वडीलांप्रमाणेच त्याने या क्यु स्पोर्ट्स प्रकारात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आरव सध्या प्रशिक्षक विग्नेश संघवी याच्या मार्गदर्शनाखाली अमानोरा फर्न क्लब येथे सराव करतो. आरव हा एनआयओएस या खुल्या शालेय अभ्यासक्रमांतर्गत सध्या दहावी परीक्षेची तयारी करत आहे.
आरव याचा स्पर्धेतील सविस्तर निकालः ज्युनिअर गट (१९ वर्षाखालील)ः अंतिम सामनाः आरव संचेती वि.वि. मोहम्मद मुस्तफा (कर्नाटक) ६-४;
उपांत्य फेरीः आरव वि.वि. अर्णव शर्मा (हिमाचलप्रदेश) ५-४;मोहम्मद वि.वि. आतिफ अन्सारी (मध्यप्रदेश) ५-१;















