पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; PDRF कडून शेकडो नागरिकांसाठी युद्धपातळीवर बचावकार्य

पुणे, दि. ६ जुलै: जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती व दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) आणि अग्निशमन दलाने विविध ठिकाणी तातडीने मदत व बचावकार्य राबवत अनेक नागरिकांचे प्राण वाचवले आहेत.

आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने केंद्रे महाराज मठात पाणी शिरले होते. या ठिकाणी अडकलेल्या २० पोलीस कर्मचारी आणि ४ नागरिकांची माहिती मिळताच PDRF पथकाने लाईफ रिंग, लाईफ जॅकेट आणि दोरीच्या सहाय्याने सर्व २४ जणांची सुरक्षित सुटका केली. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

लोणावळा परिसरातही बचावकार्य सुरू असून, पाटण-बोरज रस्त्यावर दरड कोसळल्याने ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले आहे. अन्य व्यक्तींचा शोध सुरू आहे. मावळ तालुक्यातील मळवली येथे दरड कोसळून २५ ते ३० जण अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच लोणावळ्यातील वेदांत कॉलेजमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

चाकण-चिंबळी फाटा येथील एका कंपनीत पाणी शिरल्याने अडकलेल्या २० ते २५ कामगारांची PDRF पथकाने सुरक्षित सुटका केली. घोरावडी स्टेशनजवळ पाण्यात अडकलेल्या बसमधील प्रवाशांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.

जांभे गावात घरांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्यामुळे ३० ते ३५ नागरिकांना सुरक्षितपणे जवळील प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले. धायरी येथील लक्ष्मी पार्क सोसायटीमध्ये बेडरूममध्ये अडकलेल्या ११ वर्षे व ४ वर्षांच्या दोन मुलींची अग्निशमन दलाने सुरक्षित सुटका केली.

कासारसाई गाव तसेच मंत्रा २४ वेस्ट सोसायटीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. धानोरे गावात रस्त्यावर पडलेले बाभळीचे झाड चेन-सॉ आणि क्रेनच्या मदतीने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नांदेड सिटीतील मंगल भैरव सोसायटीमध्ये गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून होणारी गळती थांबवून संभाव्य दुर्घटना टाळण्यात आली. तसेच पवना लेक परिसरातील आपटी गाव येथील रेस्क्यू कॉलनंतर मारुंजी अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.

See also  सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरावस्तेकडे महापालिकेचे लक्ष वेधण्याकरता "आप" चे आंदोलन

दरम्यान, PMRDA प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त व दरडप्रवण भागांपासून दूर राहण्याचे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

आपत्कालीन मदत क्रमांक: ९५४५२८२९३०.