मुळा नदीच्या पुरामुळे औंधमधील श्रीरामनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी; नगरसेविका भक्ती गायकवाड यांची तातडीची पाहणी

पुणे, दि. ६ जुलै : औंध येथील मुळा नदीला आलेल्या पुरामुळे श्रीरामनगर परिसरातील काही सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारक आणि रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच नगरसेविका भक्ती गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. औंध क्षेत्रीय कार्यालयामार्फत पंपाच्या सहाय्याने सोसायट्यांमध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले.

मुळा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे बाधित ठिकाणी सतत लक्ष ठेवण्याच्या तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना नगरसेविका भक्ती गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिरीष नाईकरे, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

See also  मराठी पाट्यांच्या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांचे औंध बाणेर सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकरांना निवेदन